रोजचा दिवस सूर्योद्याशिवाय जसा सुरु होत नाही तसेच रात्र चंद्रशिवाय सुनी वाटते, नाही? जरी सूर्यनारायण आपल्याला न चुकता दर्शन देत असले तरी चंद्र मात्र कलेकलेने येतो आणि पौर्णिमेला पूर्ण तर अमावास्येला आकाशात दिसत नाही. पण तुम्हाला काय वाटते, हा चंद्र जात तरी कुठे असेल? गंमत अशी आहे कि चंद्र तिथेच असतो पण चंद्राचा आपल्याला दिसणार पृष्ठभाग हा कमी जास्त होत असतो. चंद्राला स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरायला सामान कालावधी लागतो, तो म्हणजे २७.३ दिवस, म्हणूनच चंद्राची नेहमी एकाच बाजू आपल्याला दिसते. चंद्र जितका मोहक आहे, तितकीच मानवजातीला त्याबद्दल नेहमीच कुतुहूल राहिले आहे, त्यासाठीच अवकाशीय तंत्रज्ञानाच्या विकासासोबत चंद्रावर अनेक मोहीम राबवल्या गेल्या आहेत आणि अजूनही अनेक मोहीम तयार होत आहेत. आजपर्यंत १३८ हुन अधिक चंद्र मोहीम राबवल्या गेल्या आहेत, त्यामध्ये आजपर्यंत २४ अंतराळवीरांनी चंद्राला भेट दिली आहे, तर १०० पेक्षा जास्त रोबोट चंद्रावर पाठवले गेले.
चांद्रयान-१ (नोव्हेंबर २००८) आणि चांद्रयान-२ (जुलै २०१९) या भारतातील इसरो ने आखलेल्या मोहिमेमधून चंद्राबद्दल बरीचशी माहिती मिळाली. चंद्रावर पाणी असण्याचा शोध चांद्रयान-१ च्या मोहिमेतून समजले आणि चंद्राबद्दल जगाचे कुतुहूल आणखीनच वाढले, म्हणूनच आता जगातील सगळ्या अंतराळ संशोधन शाखांमध्ये चंद्राबद्दल कमीत कमी एका मोहीमेचे काम चालू झाले आहे. चंद्रावर जैविक अस्तित्वाच्या शक्यतेचे विचार सुरु झाले ते या मोहिमेने दाखवलेले पाण्याचे अस्तित्व! चांद्रयान-२ चंद्राचा अज्ञात आणि इतर कोणत्याही मोहिमांनी अन्वेषण न केलेल्या जागेवर, म्हणजेच चंद्राचे दक्षिण ध्रुव, जाऊन हजारो वर्षांपासून जर जैविक अवशेष सूर्याच्या प्रकाशाअभावी सुरक्षित असतील तर शोधण्यासाठी जुलै २०१९ मध्ये प्रक्षेपित केले गेले. काही तांत्रिक अडचणीमुळे हि मोहीम फक्त ९५% यशस्वी झाली आणि अजूनही चांद्रयान-२ त्याला मिळणारी नवीन माहिती आपल्यापर्यंत रोज पाठवत आहे.
मानवाची इतर ग्रहावरती वस्ती तयार करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने चंद्र सर्वात जवळचा असल्यामुळे, मंगळावरच्या मानवी वस्तीच्या स्वप्नाचे परीक्षण चंद्रावरती प्रयोग करून पाहण्यात सर्व अंतराळ संशोधन संस्था गुंतल्या आहेत.आकाशात दिसत असलेल्या एका चंद्रावर समाधान न मानणाऱ्या चीनने मात्र कृत्रिम चंद्राची तयारी सुरु केल्याच्या बातम्याही मध्ये खूपच गाजल्या होत्या, पण खरंच अवकाशात एकच चंद्र असेल असा वाटत का हो तुम्हाला? नाही! फक्त आपल्या सूर्यमालेत २००+ चंद्र आहेत. पृथ्वीला एकच चंद्र आहे म्हणून आपल्याला एकच चंद्र दिसतो, पण मंगळाला ४, गुरूला ७९, तर शनीला ८२ चंद्र आहेत!
जोपर्यंत गॅलिलिओने त्याच्या दुर्बिणीतून गुरुचे ४ चंद्र पहिले नव्हते तोपर्यंत आपल्याला कल्पना सुद्धा नव्हती कि नंतर इतके चंद्र आपल्याला सापडतील, म्हणून पृथ्वीच्या चंद्राला इतर काही नाव नसून फक्त ‘चंद्र’ म्हटले जाते, नाहीतर मंगळाच्या चंद्राची डेइमोस, फोबोस, अशी नावे आहेत. आपल्या चंद्राचा आपल्या समुद्र हालचालींवर परिणाम दिसून येतो, भरती- ओहोटी हा त्याचाच एक परिणाम! ३,७९,९९९ किमी दूर असूनही चंद्र इतका परिणामकारक आहे. पण हळूहळू तो पृथ्वीपासून लांब आणि लहानही होत चालला आहे. या हालचालींमुळे चंद्रावर भूकंप सुद्धा होतात. चंद्र मुळातच अवकाशातील इतर अवकाशीय वस्तूंच्या धडकण्यातून बनला आहे आणि त्यामुळेच त्याच्यावर खूप खड्डे सुद्धा आहेत.
चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे सुद्धा चंद्रामुळेच घडतात. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या आड जातो आणि त्यापर्यंत सूर्यकिरणे पोहचत नाहीत तेव्हा चंद्रग्रहण होते. चंद्राची परिक्रमेचा मार्ग प्रत्येकवेळी काही अंशी बदलतो, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या अगदी मध्ये आणि एका रेषेत येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. हि एक अगदी नैसर्गिक प्रक्रिया असून यामध्ये वेगळे, जसे कि हानिकारक किरणे, किंवा ऍन दूषित होणे असे काही घडत नाही. असो!
चंद्राला धरून आपण दिनदर्शिका हि बनवली, यावरून समजते कि पूर्वीपासून चंद्राचे आपल्या जीवनात किती महत्व आहे. अवकाशीय दुनियेचे मानवाला नेहमीच उत्सुकता लागलेली असते, पण चंद्राची गोष्टचं वेगळी आहे!
आतापर्यंत चांदोमामा च्या गोष्टी आम्ही आमच्या आजोबा आजी कडून ऐकल्या होत्या, तुम्ही सांगितलेली चांदोमामा ची गोष्ट आम्हाला खूप नवे ज्ञान शिकवून गेली.